डिजिटल क्रांतीमुळे सामान्य माणूसही बातमीदार : सुधीर लंके

 

 

पत्रकार कार्यशाळा उत्साहात संपन्न



श्रीरामपूर : 

डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही औपचारिक पदवीशिवाय सामान्य माणूस बातमीदारी करू शकत आहे. मात्र याकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून पत्रकारांनी ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडावी असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले. श्रीरामपूर येथे आयोजित पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होते.

     येथील अनमोल रसवंती गृह येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे, पत्रकार करण नवले, अनिल पांडे, महेश माळवे, राजेंद्र बोरसे, विकास अंत्रे, शिवाजी पवार, रवी भागवत, आदी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत शिवाजी पवार यांनी तर परिचय विकास अंत्रे तर प्रास्ताविक अशोक गाडेकर यांनी केले.

   कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी कोविडनंतर ग्रामीण पत्रकारितेसमोरील आव्हाने व ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील यांनी डिजिटल साधनांचा वापर संधी व आव्हाने या विषयावर मनोगत व्यक्त केले. 



कोविड नंतरच्या काळात अगदी गाव खेड्यामध्ये डिजिटल पत्रकारितेचे युग सुरू झाल्याचे पाहायला मिळते. अनेकजण आपापल्या गाव परिसरातील प्रश्नांचे वृत्तांकन डिजिटल साधनांद्वारे करत आहेत. वृत्तपत्रातील प्रतिनिधींनी सुद्धा हे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ज्यांच्या रक्तामध्ये पत्रकारिता भिनलेली आहे, त्यांना मात्र डिजिटल युगातही संधी राहील. केवळ पदवी मिळवली म्हणजे कोणीही पत्रकार ठरत नाही. तर बातमीदारीसाठी ज्याच्याकडे विषय आहेत तो पत्रकार. डिजिटल क्रांतीचे युग येत्या काळात अधिक गतिमान होईल, असे मत लंके व पाटील यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर पत्रकार संघाचे वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे ही उल्लेखनीय बाब आहे असा गौरवही त्यांनी केला.

यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयाचे वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी तर आभार अनिल पांडे यांनी मानले.


नगर जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा

नगर जिल्ह्यात ब्रिटिश काळात ज्ञानोदय ही वृत्तपत्र काढले. त्याला आज शंभर वर्ष होऊनही त्याचे अंक आजही कॉलेजमध्ये पहायला मिळतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची दखल मुंबई, पुणे येथील वृत्तपत्रांनी घेतली नाही पण ज्ञानोदय या वृत्तपत्राने घेतली होती. तसेच नेवासा तालुक्यातून मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र वृत्तपत्र काढले. नुसते वृत्तपत्र काढले नाही तर त्याची छपाई तरवडी सारख्या ग्रामीण भागातील गावात केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातून निघणारे पहिले वृत्तपत्र होते. हे वृत्तपत्र काढत असताना अनेक अडचणी आल्या त्यावेळी मुकुंदराव पाटील यांना मदत करण्यासाठी चक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज पुढे सरसावले होते हे वैशिष्ट दाखवत पत्रकारितेचा वारसा कसा हे दाखवून दिले. नगर जिल्ह्यातील पत्रकारितेचा वारसा कसा आहे हे आजच्या पत्रकारांना दाखवून दिला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या