साईज्योती प्रदर्शनावर वादळ; ‘मोजक्यांचाच लाभ’ देण्याचा आरोप

अधिकाऱ्यांचे साटेलोटे की नियोजनातील घोळ?

अहिल्यानगर : पाच फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या साईज्योती सरस २०२६ या भव्य प्रदर्शनाबाबत जिल्हाभरात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, अहिल्यानगर व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाच्या नियोजनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी मोजक्या लोकांना हाताशी धरून कार्यक्रम पुढे नेल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येच नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमातून महिलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात प्रदर्शनाच्या नियोजनातच दुजाभाव झाल्याचे आरोप पुढे येत आहेत. साईज्योतीसारख्या महत्त्वाच्या उपक्रमाचा लाभ सर्व बचत गटांना मिळायला हवा असताना, तो मोजक्याच गटांपुरता मर्यादित ठेवण्यात आल्याचा आरोप बचत गट सदस्यांनी केला आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडून बचत गटांना स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे. मात्र या स्टॉलसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असतानाही नेहमीप्रमाणे तेच तेच गट पुढे येत आहे. अनेक पात्र बचत गटांनी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार होत आहे. काहींनी ही बाब कार्यालयातील वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर ‘स्टॉल वाटपात पारदर्शकता आहे का?’ असा सवाल उपस्थित होत असून, यामागे काही अधिकाऱ्यांचे खास हितसंबंध तर नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.या प्रदर्शनासाठी निमंत्रणे देतानाही भेदभाव झाल्याचा आरोप अधिक ठळकपणे समोर आला आहे. “जे आमच्या संपर्कात आहेत, त्यांनाच निमंत्रण” असा अलिखित नियमच काही अधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. शहरातील प्रतिष्ठांनाही त्यांनी त्याच पध्दतीने निमंत्रण दिलेले आहे.मोजक्याच लोकांना निमंत्रण दिल्याने या संपूर्ण कार्यक्रमामागे काही तरी गौडबंगाल असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जर कार्यक्रम सर्वांसाठी असेल, तर निमंत्रण वाटपात गुप्तता का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.निमंत्रण व पत्रिका वाटपाची जबाबदारी नेमकी कोणाकडे होती, स्टॉल वाटपाचे निकष काय होते आणि त्याचे पालन झाले की नाही, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उमेदसारख्या महत्त्वाच्या अभियानाच्या नावाखाली जर मोजक्यांनाच लाभ दिला जात असेल, तर हा प्रकार गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बचत गट सदस्यांसह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

कार्यक्रमाची माहिती मागून देण्यास टाळाटाळजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांकडे काहींनी साईज्योती प्रदर्शनातील कार्यक्रम काय याची माहिती मागविली होती. हा कार्यक्रम नेमका कसा होणार, कोण सहभागी असणार, स्टॉल वाटपाचे निकष काय, याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.  ही बाबही संशयास्पद ठरत असून, माहिती लपवण्यामागे नेमका उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या