CRIME : मारहाणीला कंटाळून वडील व भावानेच केला खून....

 



वांबोरी घाट खून प्रकरणाची उकल

राहुरी : प्रतिनिधी –


 वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात दरीत गोणीत बांधून फेकण्यात आलेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेने धक्कादायक सत्य समोर आणले आहे. मयताचा खून हा परक्याने नव्हे, तर सख्ख्या वडील आणि भावानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वाद आणि सततच्या त्रासातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी वांबोरी ते डोंगरगण मार्गावरील घाट परिसरात दरीत गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला. हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करताना टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणे हा बेपत्ता असल्याचे समोर आले.


 संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या वडील शिवाजी कवाणे (५५) व भाऊ योगेश कवाणे (३०) यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. किरण हा वारंवार दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करत असल्याने संतापातून त्याचा खून केल्याचे त्यांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली आहे.


घरातील तणाव आणि असह्य झालेल्या परिस्थितीतून टोकाचे पाऊल उचलल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या