पुणे : पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे दि. ६ व ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ‘स्पेक्ट्रम’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव विशेषतः आयोजित करण्यात येत असून तो प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकडूनच राबविला जात आहे. महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तांत्रिक ज्ञान व कौशल्यांची कसोटी पाहण्यासाठी रोबो ड्राइव्ह, ई-पॅराडॉक्स, ब्लाइंड कोडिंग आणि हाय पिंग अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रोबो ड्राइव्हमध्ये स्वतः तयार केलेल्या रोबोटच्या साहाय्याने कार्य पूर्ण करावे लागणार आहे, तर ई-पॅराडॉक्समध्ये तांत्रिक समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता तपासली जाईल. ब्लाइंड कोडिंगमध्ये स्क्रीनकडे न पाहता कोड लिहिण्याचे आव्हान देण्यात येणार आहे.
तांत्रिक स्पर्धांबरोबरच वादविवाद, मॉडेल मेकिंग आणि मॉलेक्युलर मॉडेलिंगसारखे उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. यामधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पकता व विश्लेषणात्मक विचारशक्तीला चालना मिळणार आहे.
या महोत्सवाचा उद्देश प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. स्पर्धात्मक वातावरणाची सवय लागावी, कल्पना मांडण्याची व प्रयोगशीलता दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवादामुळे दृष्टीकोन व्यापक होऊन ज्ञानविनिमय वाढीस लागेल.
महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व सहकारी यांचे सहकार्य लाभले असून स्पर्धांचे परीक्षण अनुभवी परीक्षकांकडून केले जाणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रथमवर्ष शाखेच्या विभागप्रमुख डॉ. लीना शर्मा व तसेच त्यांचे सहकारी डॉ. निशी गुप्ता, डॉ.संजय मापारी व डॉ.महादेव कदम यांनी केले आहे.
‘स्पेक्ट्रम’ हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास विद्यार्थी प्रतिनिधी अर्जुन खलाटे, श्रावणी वाबळे, अनय गावंडे, ईश्वरी पांढरे, कार्तिक राणा आणि बलविंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे.


0 टिप्पण्या