राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी दादासाहेब सोनवणे...
श्रीगोंदा : शहरातील शिवाजीनगर परिसरात आज दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले. महाविद्यालयीन तरुणीसमोर एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.मृत तरुणाचे नाव सागर सखाराम निंबाळकर (वय २५) असे असून तो HDFC Bank मध्ये कार्यरत होता.
प्राथमिक माहितीनुसार, सागर हा दुपारी शिवाजीनगर येथील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे आला होता. काही वेळातच त्याने त्या खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणीसमोरच ही घटना घडल्याने ती प्रचंड धक्क्यात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने संबंधित तरुणाला तात्काळ श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वी कोणताही वाद, तणाव किंवा वैयक्तिक कारण होते का, याचा शोध घेतला जात आहे.घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तरटे करत आहेत

0 टिप्पण्या