श्रीरामपूर पालिकेचा गलथान कारभार; उघड्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
श्रीरामपूर (अहिल्यानगर):
शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून श्रीरामपूर नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. शहरातील कर्मवीर चौक, वरद हॉस्पिटल परिसर आणि शहजादे परिसर या मुख्य भागांतील गटारे गेल्या अनेक दिवसांपासून साफ न केल्याने या परिसरात 'नरकयातना' सोसाव्या लागत असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
गटारे तुंबली, घाण पाणी !
मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील गटारे कचरा आणि साचलेल्या गाळाने पूर्णपणे लबालब भरली आहेत. परिणामी, सांडपाणी वाहून न जाता ते थेट रस्त्यावर पसरत आहे. यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
वरद हॉस्पिटलसारख्या संवेदनशील वैद्यकीय क्षेत्राच्या शेजारीच घाणीचे साम्राज्य पसरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
1: साचलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
2: डबक्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताची भीती
अनेक ठिकाणी गटारे उघडी असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. "आम्ही वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या, पण प्रशासन अजूनही सुस्त आहे," अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे
जर येत्या दिवसांत या भागातील गटारांची स्वच्छता करून उघड्या गटारांवर झाकणे बसवली नाहीत, तर नगरपालिकेवर तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

0 टिप्पण्या