राहुरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ! प्राजक्त तनपुरेंची माघार

 राहुरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 

प्राजक्त तनपुरेंची माघार !


 शरद पवार गटाकडून गोविंदराव मोकाटे रिंगणात




झरेकाठी  :  वार्ताहर 


राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे प्राजक्त तनपुरे यांनी अनपेक्षितपणे उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ऐनवेळी शरद पवार गटाकडून गोविंदराव मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला आता नवे वळण मिळाले आहे.


गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील, अशी निश्चिती होती. मात्र, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान तनपुरे यांनी घेतलेली माघार सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली आहे. विशेष म्हणजे, तनपुरे यांच्या वाड्या वर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि रविंद्र चव्हाण यांनी भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीनंतरच त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीमुळे राहुरीच्या राजकारणात काही गुप्त 'समझोता' झाला आहे का? अशी चर्चा आता जनसामान्यात रंगू लागली आहे.


एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीत अचानक गोविंदराव मोकाटे यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मोकाटे हे देखील राहुरी स्थानिक असल्याने पवारांनी स्थानिक उमेदवाराचा पत्ता टाकत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. "तू नसेल तर दुसरा असेल" हा संदेश देत पक्षाने आपली जागा रिक्त ठेवणार नसल्याचे दाखवून दिले आहे.


राहुरीत घडलेल्या या नाट्यमय घडामोडी केवळ स्थानिक पातळीपुरत्या मर्यादित आहेत की याचे पडसाद जिल्ह्याच्या इतर राजकारणावरही पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तनपुरेंची माघार आणि मोकाटेंचा अर्ज यामागे काही राजकीय तडजोड झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः राहुरीच्या स्थानिक राजकारणात विखे विरुद्ध तनपुरे असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळाला आहे, अशा वेळी झालेली ही 'भेट' आणि त्यानंतर झालेली ही उलथापालथ राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.



ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये या 'समझोत्या'च्या चर्चेमुळे नाराजी आहे की हे पक्षाचे धोरण आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र, गोविंदराव मोकाटे यांच्या उमेदवारीमुळे आता राहुरीची लढत अधिक चुरशीची होणार, हे मात्र नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या