माणुसकीला चटका लावणारी घटना; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात ११ जणांचा बळी

कल्याण/टिटवाळा: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज सोमवारी सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. सिमेंट मिक्सर आणि प्रवाशांनी भरलेली काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाडमधील काही रहिवासी इको गाडीतून (क्र. अद्याप स्पष्ट नाही) कल्याणच्या दिशेने जात होते. सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास ही गाडी पांजार पुलावर आली असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव सिमेंट मिक्सरने या टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे.

११ जणांचा मृत्यू; एक आजी बचावली

या टॅक्सीमध्ये एकूण १२ प्रवासी प्रवास करत होते. धडक बसताच त्यातील ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या भीषण अपघातातून एक आजी आश्चर्यकारकरित्या बचावल्या आहेत, ज्याला 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय आल्याचे बोलले जात आहे. गंभीर जखमी झालेल्या एका प्रवाशाला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांची धाव आणि बचावकार्य  अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढताना स्थानिकांचेही डोळे पाणावले होते. टिटवाळा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आणि अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

तपासाचे चक्र सुरू

हा अपघात चालकाचा ताबा सुटल्यामुळे झाला की वेगाच्या अतिरेकामुळे, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतांची अधिकृत ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या