राहुरी-नगर-पाथर्डी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 'विराट' शंखनाद!

महायुतीचे अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन





झरेकाठी वार्ताहर 


राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला असून, आज या रणधुमाळीत महायुतीने आपला हुकुमी एक्का मैदानात उतरवला आहे. दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी "मला अक्षय म्हणून नाही, तर 'कर्डिले साहेब' म्हणून सेवा करण्याची संधी द्या," अशा शब्दांत त्यांनी मतदारांना साद घातली. काय घडलं या शक्तीप्रदर्शनात? पाहूया हा विशेष रिपोर्ट...




राहुरीची ही गर्दी, हे भगवे-निळे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह... हे चित्र आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळचं. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता, राहुरीत आज जनसागराचा महापूर लोटला होता. निमित्त होतं 'विजयी निर्धार मेळाव्याचं'.


या मेळाव्याला महायुतीचे सर्वच दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपूते , आमदार मोनिका राजळे , आमदार विठ्ठलराव लंघे , आमदार काशिनाथ दाते , आमदार अमोल खताळ , रिपाई जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , सुभाष पाटील अशा नेत्यांच्या उपस्थितीने विरोधकांना एक प्रकारे तगडा इशाराच देण्यात आला.


"कर्डिले साहेबांचा प्रवास कुस्तीच्या आखाड्यापासून ते निवडणुकीच्या मैदानापर्यंत अत्यंत जिद्दीचा होता. त्यांची कार्यशैली आजही लोकांच्या मनात घर करून आहे," अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी शिवाजीराव कर्डिलेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी प्राजक्ता तनपुरे यांच्या भेटीचा संदर्भ देत, अक्षयला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.



पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिलेंच्या सुशिक्षित आणि तरुण नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं. "हा विजय केवळ एका जागेसाठी नाही, तर महायुतीच्या विकासाच्या स्वप्नासाठी आहे," असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं.


पण या संपूर्ण मेळाव्याचा सर्वात चर्चेचा आणि भावूक क्षण ठरला तो म्हणजे अक्षय कर्डिले यांचं भाषण. साहेबांच्या आठवणीने गदगद झालेल्या अक्षय यांनी थेट जनतेच्या हृदयात हात घातला.


जशी साथ तुम्ही आजवर कर्डिले साहेबांना दिली, तशीच साथ या मुलाला द्या. मला 'अक्षय' म्हणून नव्हे, तर 'कर्डिले साहेब' म्हणून तुमची सेवा करण्याची संधी द्या!


व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, सुरेश धस यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांची उपस्थिती महायुतीची अभेद्य एकजूट दर्शवत होती. विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी कर्डिले साहेबांच्या सहा टर्मचा दाखला देत अक्षय कर्डिलेंमध्ये तोच 'कर्डिले पॅटर्न' असल्याचे सांगितले


हजारो कार्यकर्त्यांच्या घोषणांनी राहुरी परिसर दणाणून गेला होता. या शक्तीप्रदर्शनानंतर आता राहुरी-नगर-पाथर्डीच्या मैदानात महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे. आता या पोटनिवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


तर हे होते अक्षय कर्डिले यांच्या अर्ज दाखल करण्याचा 'मेगा इव्हेंट'.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या