संसाराची राखरांगोळी आणि एका सुखी घराचा अंत!
धार (मध्य प्रदेश) : प्रेमाला अडीच अक्षरांचं पवित्र बंधन मानलं जातं, पण जेव्हा याच प्रेमाचं रूपांतर अंधाधुंद हवसेत आणि द्वेषात होतं, तेव्हा काय भीषण घडू शकतं, याचं सुन्न करणारं उदाहरण मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात समोर आलं आहे. ज्या पत्नीने सात फेरे घेऊन आयुष्यभर सोबत निभावण्याची शपथ घेतली, तिनेच आपल्या पतीचा 'काटा' काढला. पण या हत्येमागील कारण आणि त्या कुटुंबाची व्यथा ऐकली तर कोणत्याही संवेदनशील मनाचा थरकाप उडेल.
'बनाव' जो ३६ तासांत उघड झाला
घरात चोर शिरले, झटापट झाली आणि पतीचा जीव गेला... पती देवकृष्ण पुरोहित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना पत्नी प्रियांका हंबरडा फोडून रडत होती. तिने स्वतःला दुसऱ्या खोलीत बांधून घेतलं होतं, दागिने लपवले होते, जणू काही दरोडेखोरांनीच हा सगळा धुमाकूळ घातला असावा. पण पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून काही सुटलं नाही. अवघ्या ३६ तासांत प्रियांकाचा हा रडण्याचा बनाव उघडा पडला आणि समोर आला एक भयानक कट.
"तू मला शोभत नाहीस..." - तुच्छतेची ती ठिणगी
देवकृष्णच्या बहिणीने, ज्योतीने दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. प्रियांका आपल्या पतीला सतत मानसिक त्रास द्यायची. केवळ दिसायला काळा आहे, म्हणून ती त्याचा तिरस्कार करायची.
"तू काळा आहेस, मला शोभत नाहीस. माझ्या योग्यतेचा एखादा चांगला मुलगा असायला हवा होता. तू मला सुखी ठेवू शकत नाहीस, मला घटस्फोट दे," असे टोमणे ती दररोज देवकृष्णला मारायची.
एका पुरुषासाठी आपल्याच पत्नीकडून ऐकलेले हे शब्द एखाद्या शस्त्रापेक्षा कमी नव्हते. तरीही देवकृष्ण संसाराचा गाडा ओढण्याचा प्रयत्न करत होता.
खिडकीतून दिसणारा 'तो' आणि तुटलेलं नातं
प्रियांकाचं मन सासरी कधीच रमलं नाही. २०२० पासून तिचे कमलेश नावाच्या तरुणाशी संबंध होते. ती सासरी आली तरी तिचं लक्ष खिडकीबाहेर असायचं. तिचा प्रियकर दिवसातून तीन-तीन वेळा घराबाहेरून फेऱ्या मारायचा. तासनतास मोबाईलवर चालणारं बोलणं आणि त्यावरून होणारे गृहकलह यामुळे हे घर आधीच पोखरलं गेलं होतं. तीन वर्षे ती माहेरी राहिली, तरीही मोठ्यांच्या मध्यस्थीने ती परत आली, पण मनात सुधारण्याची इच्छा नव्हती, तर पतीला संपवण्याचा कट होता.
एका आईची आर्त हाक: "तिला फाशीच द्या!"
एकीकडे लेकाचा सरण पेटलं होतं आणि दुसरीकडे सून मास्टरमाईंड निघाली होती. देवकृष्णची आई लक्ष्मीबाई आज सुन्न आहेत. "माझ्या सुनेनं माझ्या लेकाला संपवलं, तिला आता फाशीच व्हायला हवी," ही त्यांची मागणी केवळ एका सासूची नाही, तर एका हतबल आईची आहे जिचा आधार तिच्या सुनेनेच हिरावून घेतला.
हत्येचा १ लाखाचा 'सौदा'
प्रियांकाने प्रियकर कमलेशच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणलं. कमलेशने त्याचा मित्र सुरेंद्रला १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. रात्री गाढ झोपेत असताना, जेव्हा माणूस सर्वात जास्त सुरक्षित असतो, तेव्हाच सुरेंद्रने देवकृष्णवर वार केले.
आज देवकृष्ण या जगात नाही, प्रियांका तुरुंगाच्या गजाआड आहे आणि एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. सौंदर्याच्या खोट्या कल्पना आणि अनैतिक संबंधांच्या हवसेपोटी एका निष्पाप जिवाचा बळी गेला, हेच या घटनेचं दाहक वास्तव आहे.
0 टिप्पण्या