#Devotional_Story : बुवाबाजी बाजूला ठेवा, संतांचा समतेचा विचार जपा...

संगमनेर खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात


"पसायदान हे मानवतेच्या कल्याणाचे महाकाव्य, वारकरी संप्रदाय समतेचा आधार!" – बाळासाहेब थोरात

संगमनेर (प्रतिनिधी):

"शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीचा मार्ग नसून तो सर्व समाजाला, अठरापगड जाती-धर्माला एकत्र घेऊन चालणारा समतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वरांनी दिलेले 'पसायदान' हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, आजच्या युद्धाच्या आणि संघर्षाच्या वातावरणात जगाला पसायदानातील शांततेच्या विचाराचीच गरज आहे," असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.


संगमनेर खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


विद्वेषाच्या युगात संतांची 'समता' महत्त्वाची

आपल्या भाषणात थोरात पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाला मोठी संतपरंपरा आहे. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्या काळी मोठा सामाजिक त्रास सहन करावा लागला, तरीही त्यांनी जगासाठी 'पसायदान' मागितले. सर्वांच्या जीवनात सुख-आनंद मिळावा आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा, हाच वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा आहे.

"संत चोखोबांपासून ते संत गोरा कुंभार आणि नरहरी सोनारांपर्यंत अठरापगड समाजातील संतांनी या मांदियाळीत समतेचा विचार पेरला. 'अवघा रंग एक झाला' असे म्हणत सोयराबाईंनी मानवतेचे जे वर्णन केले, तेच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन आहे."




बुवाबाजीला थारा नाही, केवळ मानवतेची सेवा!

वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य सांगताना थोरात यांनी स्पष्ट केले की, या संप्रदायात अंगारे-धुपारे, गंडे-दोरे किंवा कोणत्याही प्रकारच्या बुवाबाजीला थारा नाही. हा संप्रदाय शुद्ध आचरण आणि भेदाभेदविरहित समाजाची निर्मिती करतो. हाच शुद्ध विचार आपल्याला पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे.

संगमनेरचा विकास हीच ईश्वरसेवा - ह.भ.प. कविराज महाराज झावरे

यावेळी कीर्तनरूपी सेवा देताना ह.भ.प. कविराज महाराज झावरे म्हणाले की, "वारकरी संप्रदायाचा सर्वसमावेशक विचार आचरणात आणणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब थोरात. त्यांनी सर्वांना सामावून घेत संगमनेर तालुक्याला राज्याच्या नकाशावर अव्वल स्थानी नेले आहे. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे."

भक्तांची मांदियाळी

या सोहळ्यासाठी संगमनेर खुर्दसह परिसरातील भाविक, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गावकऱ्यांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आर. एम. कातोरे, एस. पी. गोडसे, गणेश शिंदे, रोहिणी गुंजाळ, श्वेता मंडलिक यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या