तनपुरे यांनी स्वखर्चाने डीपी बसवला,

 घोरपडवाडीला काढले अंधारातून बाहेर 






राहुरी :

राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथे गावठाणातील वीज वितरणासाठी असलेली डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) जळाल्याने संपूर्ण गाव अंधारात गेले होते. महावितरणच्या सुरू असलेल्या संपामुळे डीपी त्वरित मिळण्याची शक्यता नसताना, स्थानिक पातळीवर पुढाकार घेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवघ्या काही तासांत स्वखर्चातून नवीन डीपी उपलब्ध करून देत गावकऱ्यांना दिलासा दिला.

           दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घोरपडवाडीतील गावठाण डीपी जळाली. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी संप सुरू असल्याने डीपी मिळण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे आधीच अंधारात असलेल्या गावाची अडचण आणखी वाढली. घोरपडवाडी हे गाव जंगला लगत असल्याने परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गावातील गोविंद शेंडगे व अशोक शेंडगे यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यावर त्यांनी तातडीने प्रतिसाद देत, महावितरणचा संप सुरू असल्याने अधिकृतरीत्या डीपी मिळण्यास विलंब होईल. मात्र काळजी करू नका, आजच माझ्या स्वखर्चातून डीपी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिले. त्यांनी आपल्या कारखान्याच्या वाहनातून आवश्यक डीपी घोरपडवाडीत पाठवून तातडीने बसवण्याची व्यवस्था केली. संबंधित कामगारांची टीमही त्यांनीच उपलब्ध करून दिली. परिणामी, अवघ्या तीन तासांत डीपी बसवून गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
           माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या या तत्पर आणि मदतीच्या भूमिकेमुळे घोरपडवाडी गाव पुन्हा प्रकाशात आले असून, ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या