22 वर्षापासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या श्रीगोंदा पोलिसांची वेशांतर करून कारवाई




श्रीगोंदा प्रतिनिधी  : - तब्बल २२ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी नाव बदलून अनेक वर्षे पोलिसांची दिशाभूल केली होती. मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे या कारवाईसाठी श्रीगोंदा पोलिसांनी वेशांतर करून आरोपीचा माग काढला होता.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात २००४ मध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १५८/२००४ (भा.दं.वि. कलम ३९४, ३४) मधील फरार आरोपी महेश दरड्या पवार (वय ४५, रा. निमगाव खलू, ता. श्रीगोंदा) हा नाव बदलून श्रीगोंदा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.
त्यानुसार माहितीची खातरजमा करून २७ जून रोजी पोलिस पथकाने वेशांतर करून सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईने दरड्या पवार यांच्याशी पुनर्विवाह केल्यामुळे मूळ नाव महेश श्याम पवार असून, जुन्या गुन्ह्यात महेश दरड्या पवार या नावाने नोंद असल्याने तो याच नावाचा गैरफायदा घेत ओळख लपवून राहत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख निश्चित करून अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. मनोहर खिळदकर, पो.कॉ. आनंद मैड, वैजिनाथ कुटे, राहुल मोढळे, अरुण पवार, पळसे, पोहेकॉ. पांडुरंग भांडवलकर, नितीन नरुटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली लाड व शरद चोभे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.२२ वर्षांनंतर फरार आरोपीला बेड्या ठोकण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आल्याने त्यांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या