अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेट : शिरूरमधून एका डॉक्टरला अटक, आरोपींची संख्या 24 वर


​श्रीरामपूर  : बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या आणि अवैध गर्भपात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलीस प्रशासनाने पर्दाफाश केला असून, या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिसांच्या बारकाईने सुरू असलेल्या तपासात काल (गुरुवारी) पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे.

डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय ५४, बीएएमएस, रा. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.या रॅकेटमध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी त्यांना राहाता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपी डॉक्टर यास ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीदरम्यान, त्यांच्याकडे कोणते एजंट गर्भवती महिलांना पाठवत होते आणि आतापर्यंत त्यांनी किती महिलांच्या चाचण्या किंवा गर्भपात केले, याचा कसून तपास केला जाणार आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यांची व्याप्ती वाढतच चालली आहे. त्या अनुषंगाने व तांत्रिक तपासाच्या आधारे या रॅकेटचे जाळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पसरल्याचे समोर आले आहेत. यामध्ये अनेक नामांकित डॉक्टर, मेडिकल चालक आणि एजंट सक्रिय आहेत. यात एकूण अटक २४ आरोपीना अटक केली असून डॉक्टर ०८, मेडिकल चालक ०३ वैद्यकीय साहित्य पुरवठादार ०१ (मोठा पुरवठादार) असे आरोपी गजाआड केले.त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तपासादरम्यान, पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणि आरोपींकडून अवैध गर्भलिंग निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ६ सोनोग्राफी मशीन जप्त केल्या आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या ४ चारचाकी गाड्या आणि १ दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.या कारवाई कामी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सुचनेनूसार सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांचे पथक अतिशय तांत्रिक आणि बारकाईने करत आहेत. या प्रकरणात आगामी काळात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या