एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची बदली

 




-

डॉ. विजय मकासरे यांनी मानले एसपी मुमक्का सुदर्शन यांचे आभार

अहिल्यानगर-  जिल्हा गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती शिर्डी येथे साई संस्थान सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे आभार व्यक्त केले आहेत.

पोलीस कस्टडीत असलेल्या अमली पदार्थांची कथित चोरी व विक्री प्रकरणात गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर याच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. मकासरे यांनी यापूर्वी केली होती.

डॉ. मकासरे यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच आमदार अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. पोलीस कस्टडीतून अमली पदार्थ बाहेर जाऊन त्यांची विक्री होणे ही गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किरणकुमार कबाडी यांची एलसीबीमधून बदली करण्यात आल्यानंतर डॉ. मकासरे यांनी याकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले असून, "चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा संदेश या निर्णयातून गेला आहे," असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, अमली पदार्थ प्रकरणातील चौकशी पूर्ण करून जबाबदार आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. मकासरे यांनी पुन्हा एकदा केली आहे. या प्रकरणात पुढे कोणते निष्कर्ष समोर येतात आणि चौकशीचा अहवाल काय सांगतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या