देवळाली प्रवरातील अपघातातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू



राहुरी  : प्रतिनिधी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गुहा परिसरासह देवळाली प्रवरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
      गणेश राजेंद्र जाधव (वय २६, रा. गुहा, ता. राहुरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून देवळाली प्रवरा येथून गुहा गावाकडे जात असताना बागायत पीक सोसायटीजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने त्यांना राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
गणेश जाधव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणेश यांच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली असून अपघातास कारणीभूत अज्ञात वाहनचालकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या