आईच्या कुशीतच थांबला दोन लेकरांचा श्वास...



 ताथवडे येथे तिघा मायलेेकरांची सामूहिक आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून उचललेले टोकाचे पाऊल 

पुणे : जीवनातील संकटे कितीही मोठी असली तरी ती आईच्या मायेपेक्षा मोठी नसतात, असे म्हटले जाते. मात्र ताथवडे येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने हा विश्वासच हादरवून टाकला आहे. एका आईसह तिच्या दोन निष्पाप लेकरांचे मृतदेह घरात आढळल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

कल्पना बिपीन सूर्यवंशी (३५), शुभश्री (१७) आणि दादू (१०) या तिघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच शेजाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही दिवसांपूर्वीपर्यंत हसत-खेळत दिसणारे हे कुटुंब अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचनेने त्रस्त झालेल्या कल्पना सूर्यवंशी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. मात्र या घटनेत सर्वाधिक वेदनादायक बाब म्हणजे या संघर्षात दोन निरागस जीवही कायमचे हरपले. दहावीत शिक्षण घेणारी शुभश्री आणि अजून बालपण जगत असलेला दादू यांची स्वप्नेही आईसोबत संपल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.समाजात आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक ताणतणाव वाढत असताना अशा घटना केवळ पोलिस तपासाचा विषय राहत नाहीत, तर त्या समाजासाठी आत्मपरीक्षणाची संधी ठरतात. संकटात सापडलेल्या कुटुंबांना वेळेवर आधार, समुपदेशन आणि मदतीचा हात मिळाला असता तर कदाचित ही शोकांतिका टळली असती, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र ताथवड्यातील हे घर आता तीन जीवांच्या आठवणींनी कायमचे ओसाड झाले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या