भरधाव टोयोटा हायरायडरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू , कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल


नाझरे सुपे | प्रतिनिधी - सासवड-भिवरी रस्त्यावरील श्रीनाथवाडी, मौजे चांबळी (ता. पुरंदर) येथे भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या टोयोटा हायरायडर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २६ जून) रात्री घडली. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत युवकाचे नाव विशाल शाम मोहरकर असे असून, त्यांचे भाऊ कृष्णा शाम मोहरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक गणेश यशवंत चौलकर (वय ३८, रा. पेन कोळीवाडा, ता. पेन, जि. रायगड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १०.४५ वाजता पुण्याकडून सासवडकडे येणारी टोयोटा हायरायडर (एमएच ४० सीक्यू ४०४०) ही कार भरधाव वेगाने येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच १२ एनएन ७०९१) ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार विशाल मोहरकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात टोयोटा हायरायडर, दुचाकी तसेच जवळ उभी असलेली बलेनो कार (एमएच १२ वायडी ५५०३) यांचेही नुकसान झाले.या घटनेची नोंद सासवड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक फौजदार जाधव यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे (बकल क्रमांक १९९३) करीत असून, पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या