सोनगाव प्रतिनिधी - लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपाताच्या गंभीर प्रकरणाचा तपास आता व्यापक स्वरूपात पुढे सरकत असून पुणे येथील डॉक्टरसह एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. लोणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात आतापर्यंत तब्बल २१ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सात डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि एका वैद्यकीय साहित्य पुरवठादाराचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर नेवासा येथील डॉ. भणगे यांच्यासह दोन एजंट व सहा कुटुंबीयांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी आणखी आरोपींना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान श्रीरामपूर येथील डॉ. कुटे व डॉ. शेख यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. तसेच पुणे येथून लिंगनिदान चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचा पुरवठा करणाऱ्या डॉक्टर व व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
निफाड तालुक्यातील डॉ. कुणाल वलटे आणि मेडिकल चालक सागर उन्हाळ यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथील मेडिकल चालक जालिंदर रामदास बोरुडे याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अनेक महिलांच्या बेकायदेशीर लिंगनिदान चाचण्यांबाबत माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या राम किसन पवार उर्फ तपोश शिबू सरकार (रा. मलठण, ता. कर्जत) यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याशिवाय पुणे येथील वाघोली परिसरातील डॉ. अतुल अंकुश जाधव यालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावरही बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या केल्याचा आरोप आहे. त्यालाही न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पाच सोनोग्राफी मशीन, चार कार आणि दुचाकी जप्त तपासात आतापर्यंत विविध जिल्ह्यांतून पाच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या मोठ्या कारवाईमुळे लिंगनिदान चाचणी करणाऱ्या अवैध नेटवर्कचे धागेदोरे उघड होत असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे पुढील तपास करत आहेत.
2 attachment • Scanned by Gmail

0 टिप्पण्या