सेतू कार्यालयातील रिटर्न बॅलन्सच्या वादातून महिलेला रस्त्यात मारहाण




राहुरी प्रतिनिधी :- राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावठाण परिसरात सेतू कार्यालयातील रिटर्न बॅलन्सच्या वादातून एका महिलेला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना विजयकुमार धनवटे (वय ३२, रा. जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी विठ्ठल ढगे यांच्या राहुरी येथील सेतू कार्यालयात काम करत होत्या.
दि. २५ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अर्चना धनवटे या दुचाकीवरून बारागाव नांदूर येथून राहुरीकडे येत असताना गावठाण परिसरात आरोपी विठ्ठल बाबुराव ढगे (रा. कॉलेज रोड, राहुरी) याने त्यांना अडविले. सेतू मालकाच्या कार्डवरील रिटर्न बॅलन्स आल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर अर्चना धनवटे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आरोपी विठ्ठल बाबुराव ढगे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश सानप करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या