स्टेट बँक चौकात चालकावर जीवघेणा हल्ला; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल



अहिल्यानगर : शहरातील स्टेट बँक चौक परिसरात एका चालकावर दोन अज्ञात व्यक्तींनी लाकडी काठी व लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव अंबादास बडे (वय ४०, व्यवसाय - चालक, सध्या रा. सारसनगर, अहिल्यानगर) हे २४ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास स्टेट बँक चौक येथून घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना "थांब, थांब" असे म्हणत शिवीगाळ केली.
यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीसमोर स्वतःची गाडी आडवी लावून लाकडी काठीने त्यांच्या पाठीवर व डाव्या हातावर मारहाण केली. मारहाणीमुळे नामदेव बडे हे खाली पडल्याने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केली. तसेच एका आरोपीने लोखंडी गजाने डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. जखमींवर खाजगी हॉस्पिटल तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ पी. ए. बारगजे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या