ओझर बंधाऱ्यातून ५० हजार रुपयांच्या वाळूची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा

 


संगमनेर प्रतिनिधी : प्रवरा नदीपात्रातील ओझर बंधाऱ्याखालील भागातून अवैधरित्या वाळू उपसा करून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवरा डावा कालवा सिंचन व्यवस्थापन उपविभाग, लोणी येथील उपविभागीय अधिकारी योगेश जगन्नाथ वंगोरे (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ओझर बंधारा, ता. संगमनेर येथे २० जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात इसमांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीची १० ब्रास शासकीय वाळू चोरून नेल्याचे निदर्शनास आले.


फिर्यादीनुसार, प्रवरा डावा कालवा व प्रवरा नदीपात्राची पाहणी करत असताना ओझर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस काही व्यक्तींनी कोणत्याही परवानगीशिवाय अवैध वाळू उपसा केल्याचे आढळून आले. या बेकायदेशीर उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून पाण्याचे प्रदूषण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नदीपात्राच्या तीरभागावर बंधारे तयार झाल्याने भविष्यात पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या