श्रीरामपूर : लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता १९ झाली आहे.
या गुन्ह्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेवासा येथील डॉ. भणगे, दोन एजंट व सहा कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. पुढील तपासात विविध जिल्ह्यांतून आणखी आरोपींना अटक करण्यात आली. श्रीरामपूर येथील डॉ. कुटे व डॉ. शेख यांच्यासह पुण्यातील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य पुरवठादारालाही पोलिसांनी जेरबंद केले.
तपासादरम्यान पुण्यातील मेडिकल साहित्य पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील मेडिकल चालक जालिंदर रामदास बोरुडे (वय ४०) याचा शोध सुरू होता. अटकेची चाहूल लागल्याने तो गेल्या दहा-बारा दिवसांपासून फरार होता. अखेर श्रीगोंदा तालुक्यातील आरडगाव परिसरातील शेतातील झोपडीत लपून बसलेल्या बोरुडेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडून अवैधरित्या वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन व क्रेटा चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि एक मोठा वैद्यकीय साहित्य पुरवठादार अटकेत आहेत. तसेच पाच सोनोग्राफी मशीन व चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0 टिप्पण्या