फेसबुक पोस्टचा राग; तरुणाला मारहाण


राहुरी  :  प्रतिनिधी :घराशेजारील शेणाचा उकिरडा हटविण्यासाठी त्याचे फोटो काढून फेसबुक व इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग करून तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे २४ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने घराशेजारील शेणाचा उकिरडा हटविण्याच्या उद्देशाने त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने उकिरडा हटविल्यानंतर फिर्यादीने ग्रामपंचायतीचे आभार मानणारी आणखी एक पोस्ट केली. याचाच राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी दाम्पत्याला शिवीगाळ व दमदाटी करत पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या एका महिलेचा हात ओढून तिचा ड्रेस ओढत विनयभंग करण्यात आला. तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची व हातातील तलवारीने ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शेहबाज रज्जाक सय्यद, इम्रान नबी देशमुख, अरफान रज्जाक सय्यद व रिजवान नबी देशमुख (सर्व रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश सानप पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या