सासवड प्रतिनिधी - सासवड पोलिसांनी आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील हॉटेल कसोल कॅफे येथे छापा टाकून अवैधरित्या हुक्का बार चालविणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत अभिजीत गणेश कामठे (रा. चांबळी, ता. पुरंदर) आणि प्रज्योत अशोक चोरगे (रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ मधील कलम ४-अ व २१-अ अन्वये सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हुक्का साहित्य व इतर मिळून २६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार बाळु लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी मध्यरात्री १२.०१ वाजण्याच्या सुमारास आस्करवाडी गावातील हॉटेल कसोल कॅफेमध्ये ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान दोघेही ग्राहकांना हुक्का पुरवत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
या प्रकरणाची नोंद २७ जून रोजी पहाटे ५.५४ वाजता करण्यात आली. सहायक फौजदार जाधव यांनी दाखल अंमलदार म्हणून कामकाज पाहिले असून, पोलीस हवालदार होळकर (बकल क्र. १९३६) या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या