भंगार वेचणाऱ्या महिलेची लूट ; घरी परतताना ट्रकच्या धडकेत मृत्यू




श्रीगोंदा, प्रतिनिधी :- तालुक्यातील ढवळगाव येथील भंगार वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेची प्रथम अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून लूट केली आणि त्यानंतर मदतीसाठी घरी परतत असताना ट्रकच्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुहेरी दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
संगीता परमेश्वर शिंदे (वय ५०, रा. ढवळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगाव येथे भंगार गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना त्या एका चारचाकी वाहनात बसल्या. त्यावेळी वाहनातील दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य लुटल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी त्यांना शिरूर येथील मगर हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर सोडून पळ काढल्याचे सांगितले जाते.
घाबरलेल्या अवस्थेत संगीता शिंदे यांनी मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तेथून जाणाऱ्या एका परिचित व्यक्तीने त्यांना दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी निघाले. मात्र, काही अंतरावर मागून भरधाव आलेल्या एमएच-२० सीटी-९०९१ क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संगीता शिंदे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शिरूर पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच लुटीचा आरोप असलेल्या अज्ञात आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती मिळाली.
भटक्या-विमुक्त समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील संगीता शिंदे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून लुटीतील आरोपींना तातडीने अटक करावी, अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या