सोनई प्रतिनिधी :- नेवासा तालुक्यातील सोनईजवळील धनगरवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. २२) मध्यरात्री भुसारी वस्तीवर बिबट्याने हल्ला करून एका बोकडाचा फडशा पाडल्याची घटना घडली. यापूर्वीही परिसरात पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने शेतकरी व पशुपालक चिंतेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वांबोरी रोडलगत असलेल्या धनगरवाडी शिवारातील भुसारी वस्तीवरील शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने घुसून हल्ला केला. या हल्ल्यात एक बोकड ठार झाला. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. पावलांचे ठसे व जनावरावरील जखमांवरून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
याच रात्री मुळा उजव्या कालव्याजवळील संजय वाघ यांच्या वस्तीवरील एका कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली असून त्यात कुत्रा मृत झाला. सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनई परिसरातील ऊस शेती व दाट झाडीच्या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांनी जनावरे रात्री बंदिस्त ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे, तर पालकांनी लहान मुलांना एकटे बाहेर पाठविणे टाळले आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, वन विभागाने रात्री गस्त वाढवावी, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी तसेच ट्रॅप कॅमेरे बसवून हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा हल्ल्यांच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या