श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून उभारण्यात येत असलेल्या विस्तारित साठवण तलावाचे काम सध्या वेगाने सुरू असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर श्रीरामपूर शहराचा पुढील २५ वर्षांचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान दोन नंबर साठवण तलावाच्या जागेवर हा नवीन तलाव साकारला जात आहे.
पूर्वी १६ एकर क्षेत्रावर असलेल्या तलावाऐवजी आता ३६ एकर क्षेत्रावर आधुनिक साठवण तलाव उभारण्यात येत आहे. ४५० बाय ३०० मीटर आकारमान असलेल्या या तलावाचे एकूण क्षेत्रफळ एक लाख ३५ हजार चौरस मीटर असून त्यामध्ये तब्बल ९५७ कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता असणार आहे. त्यामुळे सन २०५१ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येची पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
तलावाच्या खोदाईचे काम पूर्ण झाले असून सध्या भिंतींच्या पायाभरणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी तलावालगतच मिक्सर प्लांट उभारण्यात आला असून स्टीलचे सांगाडे तयार करून काँक्रीटचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी सुमारे २८०० टन स्टील आणि २७ हजार ५०० घनमीटर काँक्रीटचा वापर होणार आहे. तलावाच्या भिंतींची उंची १०.५५ मीटर असून प्रत्यक्षात ८.०५ मीटरपर्यंत पाणी साठवले जाणार आहे.
पुढील सहा महिन्यांत भिंतींचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर तलावाच्या तळाला विशेष संरक्षणात्मक थर देऊन काळ्या चिकणमातीचे आवरण करण्यात येणार आहे. तलाव पूर्ण झाल्यानंतर त्याभोवती सुमारे दीड किलोमीटरचा ट्रॅक विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार असून त्याचे सुशोभीकरण केल्यास नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.
या प्रकल्पामुळे शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होणार असून भविष्यात मीटर पद्धतीने पाणीपुरवठा राबविल्यास नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करणेही शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.

0 टिप्पण्या