आयशर टेम्पोच्या धडकेत दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी




बारामती : तालुक्यातील निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे सायंकाळी झालेल्या एका अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला नऊ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. 
सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय 17) आणि सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय 15) या दोन्ही सख्ख्या बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय 9) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या