अहिल्यानगर जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ...

 पंप, औद्योगिक साहित्य अन् घरफोडीच्या घटना


अहिल्यानगर | प्रतिनिधी


अहिल्यानगर जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले असून नेवासा, जामखेड आणि श्रीरामपूर येथे घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शेतातील पाणबुडी पंप, औद्योगिक यंत्रसामग्रीचे साहित्य तसेच घरफोडी करून रोख रक्कम व दागिने लंपास करण्यात आल्याचे उघड झाले आहे.


नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील शेतकरी गोकुळ रमेश शिंदे यांच्या शेतातील सुमारे १६ हजार रुपये किमतीची पाच एच.पी.ची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. १८ ते १९ जूनदरम्यान ही घटना घडली असून नेवासा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, जामखेड तालुक्यातील मोहा शिवारातील एका सिमेंट पाईप निर्मिती कंपनीतून तब्बल १.५० लाख रुपये किमतीचे सर्व्हो कंट्रोलर, व्होल्टेज स्टॅबिलायझर, पॅनल कंट्रोल कॉन्ट्रॅक्टर व कटआऊट फ्यूज चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


श्रीरामपूर शहरातील रामचंद्र नगर परिसरात घरफोडी करून चोरट्यांनी ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, जिओ फायबर मशीन तसेच पिवळ्या धातूचे दागिने चोरीला नेण्यात आले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके कार्यरत आहेत.


#Ahilyanagar #AhmednagarCrime #TheftCase #Nevasa #Jamkhed #Shrirampur #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #RashtraSahyadri #PoliceInvestigation #AhmednagarDistrict #HouseBreaking #TheftAlert #LocalNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या