गळनिंब येथील सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न हाणून पाडला; तिघे जेरबंद




श्रीरामपूर प्रतिनिधी : - तालुक्यातील गळनिंब येथील सिद्धेश्वर मंदिरात मध्यरात्री दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला. या प्रकरणी लोणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल व चोरीच्या प्रयत्नासाठी वापरलेली साधने असा मुद्देमाल जप्त केला आहे. १२ जून रोजी पहाटे दोनच्या सुमारास मंदिर परिसरात गस्त घालत असताना रायभान वाघ यांना मंदिरातून ठोकाठोकीचा आवाज ऐकू आला. त्यांनी तत्काळ आरडाओरड करून ग्रामस्थांना सावध केले. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचताच मंदिरात असलेले तिघेजण दुचाकीवरून बेलापूरच्या दिशेने पळून गेले.
मंदिराची पाहणी केली असता दानपेटीचे बाहेरील कुलूप तोडल्याचे आढळले. मात्र आतील कुलूप सुरक्षित असल्याने कोणतीही रोकड चोरीस गेली नव्हती. तसेच दानपेटीकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलण्यात आल्याचेही निदर्शनास आले. घटनास्थळी ब्लेड, पिशवी व तुटलेले कुलूप आढळून आले.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रवरानगर–पाथरे मार्गावरून रविंद्र भिमराज कापसे (रा. वाकडी), अक्षय बाबासाहेब खरात (रा. वाकडी) व अमोल लक्ष्मण पारे (रा. कोपरगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून सुमारे ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल एन. पी. साळवे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या