महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या लग्नातील सोन्याचे गंठण लुटणारा जेरबंद

 वडाळा महादेवच्या सराईत गुन्हेगाराला अटक; साडेचार लाखांचा ऐवज जप्त

शिर्डी प्रतिनिधी : महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या विवाह सोहळ्यानंतर त्यांच्या नातेवाईक महिलेच्या गळ्यातील सुमारे सहा तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून पळालेल्या सराईत चेन स्नॅचरला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. अनिल सुभाष चिंतामणी (वय २९, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे ४ लाख ५९ हजार ५३४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

११ मे २०२६ रोजी घोरवड (ता. सिन्नर) येथील आशिर्वाद लॉन्समध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा विवाह सोहळा पार पडला होता. रात्री समारंभानंतर एक महिला शिर्डी-घोटी महामार्ग ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तिच्या गळ्यातील सहा तोळ्यांची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादीने दिलेले वर्णन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर अशोकनगर (श्रीरामपूर) येथून अनिल चिंतामणी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार प्रकाश गोनके (रा. उभाडे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) याच्यासह सिन्नर, शिर्डी व परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने लुटल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान आरोपीकडून ३८.०७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व अन्य दागिने जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध अहिल्यानगर, नाशिक आणि शिर्डी परिसरात यापूर्वीही सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा राऊत करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या