गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद, १५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


श्रीरामपूर : जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल व स्कॉर्पिओ वाहनासह एकूण १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत हरेगाव फाटा परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाजवळील एस कॉर्नर रोड परिसरात सापळा रचण्यात आला.
दरम्यान, हरेगावकडून येणारी विनानंबर स्कॉर्पिओ संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख अविनाश धनराज माकोणे (वय २७, रा. निफाड, जि. नाशिक) अशी पटली. तपासात त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारचे नऊ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.
झडतीदरम्यान आरोपीकडून ३० हजार रुपयांचे गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि १५ लाख रुपयांची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या