महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात शिर्डीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने ते येथे नतमस्तक होतात. साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि प्रसाद म्हणून घरी नेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर पेढे व इतर खाद्यपदार्थ खरेदी करतात. मात्र याच श्रद्धेचा गैरफायदा घेत भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. मंदिर परिसरातील अनेक प्रसाद दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त आणि अगदी बुरशी लागलेले पेढे विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने केवळ शिर्डीच नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
प्रसाद हा केवळ खाद्यपदार्थ नसतो; तो श्रद्धेचे प्रतीक असतो. देवस्थानातून मिळणाऱ्या प्रसादाकडे भाविक पवित्रतेच्या भावनेने पाहतात. त्यामुळे प्रसादाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणे हे गंभीर स्वरूपाचे नैतिक आणि सामाजिक अपराध मानले पाहिजे. दुर्दैवाने शिर्डीत अनेक वर्षांपासून प्रसादाच्या नावाखाली काय विकले जात आहे, त्याची निर्मिती कुठे होते, त्यामध्ये कोणते घटक वापरले जातात, त्याची मुदत किती आहे याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्राहकांना दिली जात नसल्याचे समोर आले आहे. पॅकेजिंगवर उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक, एक्सपायरी डेट यांसारख्या मूलभूत गोष्टींचाही अभाव असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन नसून अन्नसुरक्षा नियमांचाही भंग आहे.
विशेषतः बुरशी लागलेल्या पेढ्यांच्या तक्रारी समोर आल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अन्नपदार्थांमध्ये बुरशी निर्माण होणे म्हणजे ते आरोग्यासाठी घातक झाल्याचे स्पष्ट लक्षण असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे अन्नविषबाधा, पचनसंस्थेचे विकार, संसर्गजन्य आजार आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. लाखो भाविकांपैकी लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचा मोठा सहभाग असतो. अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाचा प्रसाद विकणे म्हणजे त्यांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण करणे होय.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे संबंधित यंत्रणांचे दीर्घकाळ चाललेले दुर्लक्ष. शिर्डीसारख्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध धार्मिक स्थळी दररोज हजारो लोक येत असताना तेथील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियमित नियंत्रण असणे अपेक्षित होते. स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषध प्रशासन, तसेच संबंधित इतर यंत्रणांनी वेळोवेळी तपासण्या करून नियमांची अंमलबजावणी केली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. अनेक वर्षे दगडासारखे कडक पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी होत्या, तरीही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
सुदैवाने, भाविकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. तपासण्या होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा चाचण्यांची वारंवारता वाढविणे, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि जनजागृती राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधात राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. शिर्डीतील प्रकरण समोर येताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रसाद दुकानांवर छापेमारी सुरू झाली. पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी ती केवळ तात्पुरती मोहीम ठरू नये. दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम प्रसाद विक्री व्यवसायाचे संपूर्ण नियमन आवश्यक आहे. मंदिर परिसरातील प्रत्येक प्रसाद विक्रेत्याकडे वैध परवाना असणे बंधनकारक केले पाहिजे. विकल्या जाणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थावर उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक, मुदत समाप्ती दिनांक, घटकांची माहिती आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन झाल्याची नोंद असणे संपादकीय नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने रद्द करण्याची कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. तसेच शिर्डीसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये नियमित आणि अचानक मोहिमा राबविणे यालाही तितकेच महत्त्व आहे. भाविकांनीही प्रसाद खरेदी करताना पॅकेजिंग, दर्जा आणि वैध माहिती तपासण्याची सवय लावली पाहिजे. श्रद्धा आणि जागरूकता यांचा समतोल राखणे ही आजची गरज आहे.
साईबाबांनी आपल्या शिकवणीत सत्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या नावावर चालणाऱ्या व्यापारात जर फसवणूक, भेसळ आणि नफेखोरीला स्थान मिळत असेल तर ते साईबाबांच्या विचारांनाच हरताळ फासणारे आहे. धार्मिक स्थळे ही श्रद्धेची केंद्रे असली तरी तेथे ग्राहकांचे हक्क आणि सार्वजनिक आरोग्य यांच्याशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भाविकांचा विश्वास हीच सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्याचे संरक्षण करणे ही प्रशासन, व्यापारी आणि समाज या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शिर्डीतील पेढा प्रसाद प्रकरण हे केवळ एका शहरापुरते मर्यादित नाही.
राज्यातील आणि देशातील अनेक धार्मिक स्थळांवरील प्रसाद व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व्यापक तपासणीची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. आज शिर्डीत सुरू झालेली कारवाई उद्या संपूर्ण राज्यातील तीर्थक्षेत्रांसाठी आदर्श ठरली पाहिजे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा आरोग्याशी खेळ कायमचा थांबविण्यासाठी कठोर, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण कारवाई हाच एकमेव मार्ग आहे. भाविकांच्या श्रद्धेचा मान राखत त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हेच खऱ्या अर्थाने साईसेवा ठरेल.
0 टिप्पण्या