वाकडी - श्री योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन यंदा धनगरवाडी, दिघी पंचक्रोशीत करण्यात आले आहेत. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरला बेटाचे मठाधिपती पूज्य रामगिरीजी महाराज यांच्या समवेत सप्ताह स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी भाविकांच्या सुविधेसाठी आणि परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर मात करण्यासाठी ना. विखे पाटील यांनी तात्काळ ४ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केल्याची मोठी घोषणा केली.त्यांच्या या जलद निर्णयाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानत जाहीर सत्कार केला.यावेळी महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आली. यावेळी,
प्रांतधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, सप्ताह कमिटीचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील भाविक आणि धनगरवाडी-दिघी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सप्ताहाच्या निमित्ताने होणाऱ्या या ४ कोटींच्या विकासकामांमुळे केवळ सप्ताहाच्या काळातील भाविकांची सोय होणार नसून, परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.
विखे पाटील कुटुंबियाचे सरला बेटाशी जिव्हाळ्याचे संबंध: महंत रामगिरी महाराज
याप्रसंगी सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी विखे कुटुंबाच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले की, "विखे कुटुंब आणि सरला बेटाचे नाते अत्यंत जुने आणि जिव्हाळ्याचे आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी देखील सातत्याने बेटाच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले आणि सतत संपर्क ठेवला. तोच वारसा ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे चालवत आहेत.
........
तर, हा माझा परमभाग्याचा दिवस: ना. विखे पाटील
"प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले,"अखंड हरिनाम सप्ताहाची समृद्ध आध्यात्मिक परंपरा जपणारा हा सोहळा दरवर्षी लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र ठरतो. भाविकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे निर्माण होणारे नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजन याची जागतिक स्तरावरही दखल घेतली गेली आहे. यंदाच्या सप्ताहाचे नियोजन करण्याची जबाबदारी मला मिळणे, हे मी माझे परमभाग्य समजतो. हा सोहळा लोकसहभागातून भक्तिमय, सुव्यवस्थित आणि यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा."
0 टिप्पण्या