राहुरीतील खुनाचा ७२ तासांत छडा
पोलीस निरीक्षक ठेंगे यांचे नेतृत्वाखाली आरोपी गजाआड
राहुरी : प्रतिनिधी
येथे विद्यापीठातील कंत्राटी कामगाराचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला होता. त्या खून प्रकरणात राहुरी पोलिसांना एक आव्हान होते. राहुरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांनी केवळ ७२ तासात या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावुन त्या गुन्ह्यातील आरोपीला गजाआड केल्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे राहुरी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
घडलेल्या या घटनेत राहुरी-शनिशिंगणापूर रोडलगत असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे (वय २७) या तरुणाची अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, दि. २ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ७२ तासांच्या आत राहुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे वय ३० वर्षे या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत .पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पो.निरीक्षक लवांडे, हवालदार अर्जुन दारकुंडे, प्रमोद ढाकणे, भाऊसाहेब शिरसाठ, यांच्या तत्पर आणि परिणामकारक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राहुरी पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला आहे. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील गंगाराम कोहकडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रविण कोहकडे तसेच उंबरे येथील सत्यवान साठे यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुशील साठे याला पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पावधीत जेरबंद केले होते.
0 टिप्पण्या