जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार; स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल



​अहिल्यानगर |  अहिल्यानगर येथील राज्य वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागामध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, शासनाची तब्बल ३ कोटी ८७ लाख ११ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका शासकीय अधिकाऱ्यावर कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाचे अधिकारी हेमंत लक्ष्मण गांगे यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश लक्ष्मण चव्हाण (रा. शृंगार निवास, गुलमोहर रोड, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध शासकीय रकमेचा अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश चव्हाण हा अहिल्यानगर कार्यालयात कार्यरत असताना, त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला. कार्यालयाचे कोणतेही रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवता, संगणक प्रणालीवरील महाविकास सांकेतांकाचा वापर करून आपल्या अधिकृत युझर आयडी आणि पासवर्डद्वारे मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत तब्बल ४४ चलनांमध्ये व्यापाऱ्यांच्या दुरुस्ती अर्जाशिवाय बेकायदेशीर फेरफार केले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला.
​तसेच एका पेट्रोलियम व्यापाऱ्याने भरलेला १ लाख ३० हजार ५०२ रुपयांचा कर आरोपीने स्वतःचा मुलगा अक्षय चव्हाण याच्या 'नक्ष हॉटेल'च्या खात्यावर परस्पर वर्ग करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. मुलगीर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या