आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश; वीजेच्या तडाख्यात मृत्यू झालेल्या अभिषेक दरेकर यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत


श्रीगोंदा, दि. २२ जून : घोडेगाव येथील तरुण शेतकरी अभिषेक रूपचंद दरेकर (वय २२) यांचा शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मदत मंजूर होऊन संबंधित रक्कम लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
घोडेगावचे माजी सरपंच रूपचंद दरेकर यांचे एकुलते एक पुत्र असलेल्या अभिषेक यांचा काही दिवसांपूर्वी शेतात ट्रॅक्टर चालवत असताना वीज कोसळून जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. दरेकर कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाची दखल घेत आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय मांडून शासनाकडे तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती.त्यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने दरेकर कुटुंबासाठी ४ लाख रुपयांची मदत मंजूर केली. याबाबतची माहिती देण्यासाठी तहसीलदार सचिन डोंगरे, नायब तहसीलदार व तलाठी यांनी दरेकर कुटुंबाची भेट घेतली.दरम्यान, परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते यांनीही दरेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच बाळासाहेब महाडिक यांनीही कुटुंबीयांची भेट घेत दुःखात सहभागी होत धीर दिला. या वेदनादायी प्रसंगी पाचपुते कुटुंब व सहकारी दरेकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अभिषेक यांच्या अकाली निधनामुळे आई-वडील आणि अविवाहित बहिणीचा आधार हरपला आहे. शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत ही दुःखाची भरपाई नसली तरी संकटाच्या काळात दिलासा देणारी ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
"वीजेच्या एका तडाख्याने दरेकर कुटुंबाचा आधार हिरावला; मात्र आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाची मदत वेळेत मिळाली, तर प्रतिभा पाचपुते आणि बाळासाहेब महाडिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाला धीर दिला," अशी भावना घोडेगाव परिसरात व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या