बाभुळगाव खालसा येथे ड्रग्ज इंजेक्शनचा साठा जप्त; एकास अटक, मुख्य आरोपी फरार





मिरजगाव    प्रतिनिधी-  कर्जत तालुक्यातील बाभुळगाव खालसा येथील हायवे ब्रिजखाली प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका युवकास मिरजगाव पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५८ हजार ६४० रुपये किमतीची ७७ प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शने जप्त केली आहेत.
मिरजगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ९ जून रोजी गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पप्पू ऊर्फ प्रविण लाला भोसले (रा. बाभुळगाव खालसा) याने रोहन भाऊसाहेब लाढाणे (वय २२) याच्याकडे ‘मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपी’ विक्रीसाठी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी हायवे ब्रिजखाली सापळा रचून रोहन लाढाणे याची झडती घेतली. त्याच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शन आढळून आल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रविण भोसले याच्या घराची झडती घेतली असता तेथे ७७ ड्रग्ज इंजेक्शन्सचा साठा मिळून आला. हा साठा जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी फरार झाला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल सुनील दिलीप खैरे यांच्या फिर्यादीवरून रोहन लाढाणे व प्रविण उर्फ पप्पू भोसले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, १२५, २७८ तसेच औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० मधील कलम १८ (सी) व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय झंजाड, सहाय्यक फौजदार दत्तात्रय कासार तसेच पोलिस कर्मचारी पळसे, काकडे, गाडे, सपट व गोफणे यांनी ही कारवाई केली.
ग्रामीण भागातही ड्रग्जचे जाळे पसरत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून अशा रॅकेटविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या