निरगुडसर प्रतिनिधी - निरगुडसर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथित गैरवर्तन करून शिवीगाळ व जोडे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा आंबेगाव तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ संघाच्या वतीने मंचर येथील प्रांत कार्यालयात शुक्रवारी (ता.२६) नायब तहसीलदार सचिन मुंडे यांना निवेदन दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, उपाध्यक्ष नीलेश काण्णव, सचिव चंद्रकांत घोडेकर, सोशल मिडिया अध्यक्ष सचिन तोडकर, सुदाम बिडकर, जयेश शहा, अविनाश पवार, सीताराम काळे, विवेक शिंदे, रवींद्र वाळके, लक्ष्मण ढोबळे, विशाल करंडे, मोसीन काठेवाडी, मिलिंद भांगरे, निवेदक निलेश पडवळ उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पत्रकारांसमवेत नेहमीच आदरपूर्वक संवाद असतो. त्यांनी बेताल वक्तव्य करणारे संजय पाटील यांना योग्य शब्दात समज देण्याची गरज आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असून यामुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात होत आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी. पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.

0 टिप्पण्या