ओढ्यावर बंधारा बांधून वाळू चोरी...

 


राहाता येथे गुन्हा दाखल

राहाता : प्रवरा डावा कालवा सिंचन व्यवस्थापन उपविभागाच्या तक्रारीवरून राहाता तालुक्यातील ओढ्यावर अनधिकृत बंधारा बांधून वाळू चोरी केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे ५० हजार रुपये किमतीची १० ब्रास शासकीय वाळू चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील ओझर बंधारा परिसरात अज्ञात इसमांनी ओढ्याच्या प्रवाहात बंधारा उभारून वाळू उपशाचे काम सुरू केले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या अनधिकृत बंधाऱ्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला असून पाणी दूषित झाल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच नदीपात्राच्या काठावर बांध उभारल्याने भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी प्रवरा डावा कालवा सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी योगेश जगन्नाथ वांगोरे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील संबंधित कलमे तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये राहाता पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या