खरवंडी येथे पोलिसांवर गोळीबार करून फरार आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या



पाथर्डी प्रतिनिधी : - चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पाथर्डी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या संयुक्त पथकावर पिस्तुलातून गोळीबार करून पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींपैकी तिघा आरोपींना पाथर्डी पोलिसांनी धाडसी पाठलाग करून जेरबंद केले आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे पथक अक्कलकोट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील  फरार आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड (रा. भगवानगड रोड, खरवंडी कासार, ता. पाथर्डी) याला अटक करण्यासाठी पाथर्डी येथे आले होते. या कारवाईसाठी पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही मदतीसाठी सहभागी झाले होते.
पोलीस पथक आरोपीच्या घरासमोर पोहोचले असता आरोपी पावलस उर्फ मेहेर गायकवाड याने पोलिसांना पाहून त्यांची विचारपूस केली. त्यावेळी पोलीस शिपाई आसाराम बटुळे यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र आरोपीने पोलिसांचे कोणतेही ऐकून न घेता त्याच्याकडील पिस्तुलातून थेट पोलीस शिपाई आसाराम बटुळे यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्यांच्या अंगावर न लागता जवळून गेल्याने मोठी दुर्घटना टळली.
गोळीबारानंतर आरोपीने पोलिसांवर बंदूक रोखून आपल्या साथीदारांसह घरासमोर उभ्या असलेल्या एक्सयूव्ही वाहनातून घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड व त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याने दोन स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, ९ जून २०२६ रोजी पहाटे या गुन्ह्यातील काही आरोपी खरवंडी परिसरात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे सुदाम बबन राठोड (वय २५, रा. दुर्गानगर तांडा), कृष्णा बाळू पवळे (वय २४, रा. खरवंडी) आणि ईब्राहीम महमंद सय्यद (वय १९, रा. खरवंडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) अशी सांगितली. त्यांनी आणखी दोन साथीदारांसह सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
तिघा आरोपींना ९ जून रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ११ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने, संदीप ढाकणे, पोहेकॉ बाबासाहेब बडे, पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव, इजाज सय्यद, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर इलग, महेश रुईकर, गोकुळ वाघ, संदीप कळमकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल गुंजाळ तसेच चालक रविंद्र चव्हाण आणि गोविंद दराडे यांनी सहभाग घेतला.
या धाडसी कारवाईमुळे पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश आले असून पाथर्डी पोलिसांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या