जेजुरी (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा मंदिर येथे रविवारी सायंकाळी एका पुजाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे भाविक, पुजारी व सेवेकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक महिन्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी सायंकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण व त्यांचा परिवार दर्शनासाठी गडावर आला होता. रंगमहाल परिसरातील पालखीच्या ठिकाणी काही जण चप्पल घालून जात असल्याचे पाहून येथील पुजारी अमरबारभाई गुरव यांनी त्यांना नम्रपणे सूचना केली. संबंधित जागा पवित्र असून पालखीला धार्मिक मान असल्याने तेथे चप्पल घेऊन जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.
मात्र या सूचनेचा राग आल्याने काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पुजाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी त्यांचे डोके पालखीच्या दांड्यावर आपटून मारहाण केली. तसेच अपमानास्पद वक्तव्य करत त्यांना गंभीर जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे.
या मारहाणीत पुजारी अमरबारभाई यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. वैद्यकीय तपासणी व स्कॅनिंगनंतर दुखापतीचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या घटनेनंतर जेजुरीतील गुरव, पुजारी, वीर, कोळी, गडशी, शिपाई व सेवेकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरातील धार्मिक परंपरा जपण्याचे काम करणाऱ्या पुजारी व कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक दर्शनासाठी जेजुरीत येत असतात. भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी मंदिरातील पुजारी, सेवेकरी आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असतात. मात्र काही असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे मंदिर परिसरातील शिस्त व सुरक्षितता धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ, जेजुरीकर नागरिक तसेच गुरव-पुजारी मंडळाकडून करण्यात आली आहे.
जेजुरी गडावरील पुजारी, सेवेकरी आणि कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना राबविणे, सीसीटीव्ही नियंत्रण अधिक प्रभावी करणे आणि अशा घटनांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे. शासन व प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन मंदिर परिसरातील सुरक्षितता अधिक बळकट करावी, अशी भावना व्यक्त होत आहे

0 टिप्पण्या