ताहाराबादमध्ये रमाई घरकुल योजनेत २.४० लाखांचा अपहार

कारवाईसाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

अहिल्यानगर, प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायत हद्दीत रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुदान निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुनाताई भालेराव यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केले आहे.

सन २०२४-२५ मध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे प्रत्यक्ष बांधकाम न करता २ लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्या यमुनाताई भालेराव यांनी केली आहे.

उपोषणादरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ताहाराबादचे ग्रामसेवक शिवाजी पटेकर यांना तात्काळ निलंबित करून गुन्ह्यात सहभागी करणे, तसेच लाभार्थी महेश गंगा विधाटे, प्रदीप गंगा विधाटे आणि जमीन मालक गंगा विधाटे यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय ग्रामसेवक शिवाजी पटेकर, ग्रामरोजगार सेविका पूजा झावरे, संबंधित अभियंता ब्राम्हणे तसेच लाभार्थी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून अपहार झालेली २ लाख ४० हजार रुपयांची रक्कम तात्काळ वसूल करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ गुन्हे दाखल करावेत व संबंधितांवर प्रशासकीय निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे यमुनाताई भालेराव यांनी सांगितले.

दरम्यान, या आरोपांमुळे ताहाराबाद ग्रामपंचायत परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या