न्यु शुभम हॉटेलमध्ये एक लाख रुपयांहून अधिक किमतीच्या मद्यसाठ्यासह रोख रकमेची चोरी..
पाथर्डी प्रतिनिधी : तालुक्यातील भुतेटाकळी येथील न्यू शुभम हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून प्रवेश करत विदेशी मद्याचा साठा व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल चालक भगवान विठ्ठल भाबड (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली. फिर्यादी यांनी रात्री हॉटेल बंद करून कुलूप लावले होते. सकाळी हॉटेल उघडण्यासाठी आल्यावर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. आत जाऊन पाहणी केली असता हॉटेलमधील विदेशी मद्याच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या व मोठ्या प्रमाणात मद्यसाठा गायब असल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, बिअरचा साठा तसेच गल्ल्यातील १९ हजार ७०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये विदेशी मद्याच्या २१९ बाटल्या, विविध ब्रँडच्या बिअरच्या बाटल्या आणि रोख रक्कमेचा समावेश असून त्याची एकूण किंमत १ लाख ४५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

0 टिप्पण्या