जेजुरीत तांबे चोरीप्रकरणी दोघांना अटक , १४ किलो तांबे जप्त; तीन फरार आरोपींचा शोध सुरू


नाझरे सुपे | प्रतिनिधी - जेजुरी परिसरातील तांबे चोरीप्रकरणाचा छडा लावत जेजुरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून १४ किलो तांबे जप्त केले आहे. या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जेजुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३३४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

त्यानुसार संदीप पांडुरंग मेमाने (वय ३६, रा. जेजुरी, ता. पुरंदर) आणि शंकर अण्णा पवार (वय ३४, रा. जेजुरी, ता. पुरंदर) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या घटनेत आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

तपासादरम्यान १६ जून २०२६ रोजी चोरीस गेलेला सुमारे १४ किलो तांब्याचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी तसेच फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके शोधमोहीम राबवत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष तोडकर, पोलीस हवालदार महेश खरात, विशाल भोरडे, अक्षय यादव यांनी केली. तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस हवालदार राजू मोमीन व अतुल डेरे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या