राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आदेश
मुंबई : राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे, इटरीज आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कुणीही वाचवू शकणार नाही असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. तसेच हॉटेल्सनी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत देणे गरजेचे आहे, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाने 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' ही मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असं तुकाराम मुंढे म्हणाले.
राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सर्व ठिकाणी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत उपलब्ध करण्यात यावं, बाटलीबंद पाणी देऊ नये, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा. जर एखाद्या ग्राहकाने या व्यतिरिक्त बाटलीबंद पाणी मागितलं तर त्याला ते द्यावं. जर याची अंमलबजावणी केली नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला.
ग्राहकांनी हॉटेलमध्ये आल्यानतंर त्यांना सुरक्षित पाणी, द्रवसाधन, टॉवेल, साबण देणं बंधनकारक आहे, त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहते, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
राज्यात 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये आम्ही आतापर्यंत राबवलेल्या तपासण्यांमध्ये गंभीर तुटी आढळून आल्या. अस्वच्छ, अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, वापरलेल्या तेलामध्ये अन्न तयार करणे, अन्न पदार्थांचे कमी प्रतीचे पॅकेजिंग अशा अनेक गोष्टी दिसून आल्या.
-------
सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र मोहीम
"अन्नात कुठेही भेसळ होऊ नये यासाठी काही पावलं उचलण्यात येतात, त्याची जबाबदारी राज्याच्या एफडीए आयुक्तांवर असते. 23 जून रोजी एक आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इटरिज यांनी नियम पाळणे बंधनकारक असेल. अन्न व सुरक्षा मानके यानुसार त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. अन्न उत्पादन मानके, 2011 याच्यासह अनेक नियमांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तसेच शाळेच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे."
- तुकाराम मुंढे
--------

0 टिप्पण्या