रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; ११.८ लाखांची रेल्वे मालमत्ता जप्त, चार आरोपी अटकेत

राहुरी (प्रतिनिधी) -   रेल्वेची मालमत्ता चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश करत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांनी सुमारे ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली. तर या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भारतीय रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान टळले असून रेल्वे वाहतूक सुरक्षेलाही संभाव्य धोका टाळण्यात यश आल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरपीएफ अहिल्यानगरचे निरीक्षक बेनीप्रसाद मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ क्राईम ब्रांच सब युनिट, दौंडचे पीएसआय एकनाथ गडधे, मुख्य आरक्षक रामनाथ केकान, कॉन्स्टेबल धनंजय यादव तसेच आरक्षक दीपक कर्डीले, विशाल पायघन आणि गुलाब येवले यांच्या पथकाने दौंड हायवेवरील खडकी-चिखली गावांदरम्यान सापळा रचला. संशयित वाहनांची तपासणी केली असता रेल्वेच्या सिग्नल व दूरसंचार विभागातील महत्त्वाची सामग्री बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत सागर अशोक नवसारे (रा. मुळानगर, ता. राहुरी), नितीन शंकर भालसिंग (रा. वाळकी, जि. अहिल्यानगर) आणि अमोल चंद्रभान पेरणे (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त साहित्यामध्ये सुमारे ३.५ किलोमीटर लांबीची १२ कोर सिग्नलिंग केबल, ६०० मीटर ६ कोर सिग्नलिंग केबल, सुमारे एक किलोमीटर मिश्रित १२ व ६ कोर केबल, ३९ मीटर जी.आय. पाइप, एक आर.एस. प्रकारची पॉइंट मशीन तसेच १५० किलो जी.एस. वायरचा समावेश आहे. या साहित्याची एकूण किंमत ११ लाख ८ हजार ९१२ रुपये इतकी असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्राथमिक चौकशीत संबंधित सामग्री हलविण्यासाठी रेल्वेच्या सिग्नल व दूरसंचार विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रेल्वे मालमत्ता चोरी झाल्याचा अधिकृत अहवाल सादर करण्यात आला.
पुढील तपासात निरीक्षक बेनीप्रसाद मीणा आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणातील चौथा आरोपी हरिराम चेतराम रायकवार (वायरमन तथा डेपो इंचार्ज, मूळ रा. हरदुवा मानगड, जि. दमोह, मध्य प्रदेश) याचा सहभाग उघडकीस आणला. त्याला विशापूर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
या प्रकरणी दौंड रेल्वे पोलिस ठाण्यात रेल्वे मालमत्ता (अवैध ताबा) अधिनियम कलम ३(अ) तसेच रेल्वे अधिनियम कलम १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. "ऑपरेशन रेल सुरक्षा" अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत चोरीस गेलेली शंभर टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले असून या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या