बांधकाम कामगार कार्यालयावर आयुक्तालयाच्या पथकाची धाड! दुचाकीच्या डिक्कीत सापडले इंजिनिअरचे बनावट रबरी शिक्के आणि बोगस दस्तावेज

​श्रीरामपूर: येथील इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यालयावर कामगार आयुक्तलयाच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळपासून अचानक धाड सत्र सुरू केले. या धडक कारवाईत कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून 'इंजिनिअर'चे बनावट रबरी शिक्के, बोगस दस्तावेज आणि नोंदणीसाठी आणलेले कोरे व इतर व्यक्तींचे भरलेले फॉर्म जप्त करण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे श्रीरामपूर परिसरात आणि संबंधित प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्तलयाच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी कार्यालयात प्रवेश करत तपासणी सुरू केली. सुरुवातीला कार्यालयाच्या आतमध्ये पथकाला संशयास्पद काहीही आढळले नाही. मात्र, संशयावरून कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या एका कर्मचाऱ्याच्या दुचाकीची (डिक्की) झडती घेतली असता, पथकाचे डोळेच पांढरे झाले.
​त्या डिक्कीत शासकीय कामासाठी वापरले जाणारे इंजिनिअरचे बनावट रबरी शिक्के आणि काही अत्यंत महत्त्वाचे बोगस दस्तावेज मिळून आले. पथकाने हे सर्व साहित्य तात्काळ जप्त केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

​या कार्यालयामध्ये कामगार नोंदणी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक माटा यांनी केला होता. या भ्रष्टाचाराविरोधात माटा हे गेल्या मार्च महिन्यापासून कामगार आयुक्तलयाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पुराव्यांसह कारवाईची मागणी करत होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तलयाच्या पथकाने अखेर ही अचानक धाड टाकली.

​या प्रकरणातील एक अत्यंत रंजक आणि धक्कादायक बाब म्हणजे, या कार्यालयात जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कामाला होते, ते सर्व एकाच गावातील रहिवासी आहेत. त्यातील एक कर्मचारी तक्रारदाराच्या कचाट्यात अडकल्याने कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे त्या निलंबित कर्मचाऱ्यानेच स्वतःला वाचवण्यासाठी आणि इतरांना अडकवण्यासाठी थेट तक्रारदाराच्या मदतीने हा सारा 'उद्योग' घडवून आणल्याची उलट-सुलट चर्चा सध्या श्रीरामपूर तालुक्यातील एका विशिष्ट गावात रंगली आहे.
-----
  'सीसीटीव्ही फुटेज'च पळवले? 

संबंधित संशयित कर्मचाऱ्याबाबत आधीच अनेक तक्रारी येत असल्याने, कंपनीने त्याला काही दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, कामावरून काढल्यानंतर आपले काळे कारनामे त्यांचे व इतरांना त्रास देण्यासाठी निश्चित तेथील पुरावे घेऊन गेला, म्हणून या कर्मचाऱ्याने थेट कार्यालयातील 'सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज' (डीव्हीआर) काढून नेल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
-----------

​"कार्यालयात सर्वसामान्यांची लूट आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचे या कारवाईवरून आता सिद्ध झाले आहे. बोगस रॅकेट चालवून गरिबांची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे."
— विवेक माटा (तक्रारदार)
--------

​वरिष्ठांच्या आशिर्वादाने 'कमिशनचा सुळसुळाट' 
​कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे थेट लागेबांधे असल्यामुळेच हा बोगस कारभार इतके दिवस बिनदिक्कत सुरू होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. कामावरून काढल्यानंतरही तो कर्मचारी बाहेर राहून कमिशन तत्त्वावर काम करत होता. बनावट शिक्क्यांचा वापर करून बोगस नोंदी करण्याचे एक मोठे रॅकेटच येथे सक्रिय असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी सुरू असून, यामध्ये आणखी कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांचे हात गुंतले आहेत? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या