कामरगाव येथील दर्ग्याची तोडफोड; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामरगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील डोंगरावर असलेल्या प्रसिद्ध शहारबशा बाबा दर्ग्याच्या आवारात शिरून अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कामरगाव येथील डोंगरावरील शहारबशा बाबा दर्ग्याचे पुजारी आणि खादीम महम्मद सलीन गफुर शेख (वय ५५ वर्षे, रा. कामरगाव) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दिनांक ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपासून ते दिनांक १० जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. 
कोणीतरी अज्ञात समाजकंटकांनी दर्ग्याच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी दर्ग्याचे ५ मिनार, कळस, कमान तसेच गाभाऱ्यातील शहारबशा बाबांच्या मजार आणि समाधीची मोठी तोडफोड केली. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही विटंबना करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली.
 त्यांच्यासोबत नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे व पोलीस उपनिरीक्षक पतंगे यांनीही भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १९६ आणि २९८ प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या